टाकळी ढोकेश्वर : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पारनेर सेवा संस्था मतदारसंघात उदय शेळके यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.
पारनेर तालुक्यातील मांडओहळ येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सेवा संस्थेच्या १०५ मतदारांपैकी तब्बल ९६ मतदार उपस्थित असल्याचे समजते.
बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार नीलेश लंके यांच्यासह विद्यमान संचालक उदय शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केले होते. लंके यांच्यासह बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेळके यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शेळके यांनीच निवडणूक लढवावी, असा आदेश दिला. त्यानंतर शेळके यांनी आमदार लंके यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मांडओहळ येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी माजी सभापती राहुल नंदकुमार झावरे हेही उपस्थित होते.