अहमदनगर : अविश्वास ठराव आलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना अखेर शासनाने परत बोलविण्याचा निर्णय घेतला़ माने यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात मुख्याधिकारी या अवनत केलेल्या पदावर बदली करण्यात आली आहे़जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील अनियमितता, पिंपळगाव माळवी पाणी योजनेला बेकायदा मान्यता देणे व ठेकेदाराची बिले काढणे, विकासकामे रखडविणे अशा विविध मुद्यांवरुन माने यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता़ ८ जुलै रोजी माने यांच्यावरील अविश्वास ठराव संमत करुन शासनाला सादर करण्यात आला होता़ मात्र, माने यांनी आपणास बाजू मांडण्याची संधी मिळाली नसल्याचे म्हणणे शासनाकडे सादर केले होते़ त्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, विशेष सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे शासनाने खुलासा मागविला होता़ त्यावर विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्यासमोर २ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती़ या सुनावणी वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विखे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी आपला खुलासा सादर केला होता़ माने यांना सभेची नोटीस देऊन त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली होती, ही बाब जिल्हा परिषद अध्यक्षा विखे व सदस्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली़ नाशिक विभागीय आयुक्तांकडेही याबाबत पुराव्यानिशी विखे यांनी खुलासा सादर केला होता़ मात्र, विभागीय आयुक्त माने यांनी त्यावरील निर्णय विचाराधीन ठेवला होता़ त्यानंतर अखेर बुधवारी (दि़७) सरकारने माने यांच्या बदलीचा आदेश काढला आहे़मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अवनत केलेल्या पदावर माने यांची बदली करण्यात आली आहे़ माने यांच्या जागेवर नवी मुंबई येथील सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक एस़ एस़ पाटील यांची नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे़ माने यांनी नगर जिल्हा परिषदेचा पदभार तत्काळ सोडून नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे शासन आदेशात म्हटले आहे़
अखेर मानेंना शासनाचा धक्का : सीईओ म्हणून पाटील घेणार जिल्हा परिषदेचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 5:35 PM