अहमदनगर : शहरातील वाडियापार्कमधील अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने रविवारी सकाळी सात वाजता हातोडा टाकला. नगर शहरात वाडियापार्क हे खेळाचे मोठे मैदान आहे. या मैदान परिसरात ५७ हजार ५०० चौरस मीटर बांधकाम करण्याची परवानगी विकासकाला देण्यात आली होती. परंतु विकासकाने त्या ठिकाणी दीड लाख चौरस मिटरचे अनाधिकृत बांधकाम केले आहे. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी वाडियापार्क येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस संरक्षणात रविवारी सकाळी ७ वाजता कारवाईला सुरूवात झाली. ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. वाडियापार्क परिसरातील सुमारे दोन हजार चौरस फुटाचे अनाधिकृत बांधकाम आहे. ही इमारत दोन मजली आहे. त्यापैकी पहिला मजला जेसीबीच्या साह्याने मोकळा करण्यात आला. दरम्यान, विकासकाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुपारी कारवाई थांबविण्यात् आली.
नगरच्या वाडियापार्कमधील अनाधिकृत बांधकाम पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 1:13 PM