तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील ऐतिहासिक वेशींजवळच अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. कोरोना महामारी संचारबंदी असतानाही अत्यंत वेगाने होत असलेली ही पक्की बांधकामे शहराच्या मुख्य महामार्ग, बाजारतळ, ग्रामपंचायत कार्यालय अशा मध्यवर्ती ठिकाणी होत आहेत.
आठवडे बाजाराच्या कोंडीसह ऐतिहासिक वेशींनाही यामुळे धोका निर्माण होण्याचा धोका आहे. हे बांधकाम बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सेवा संस्थेचे संचालक बाळासाहेब गारुडकर यांनी केली आहे. गटविकास अधिकारी, पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी यांना गारूडकर यांनी निवेदन पाठविले आहे.
प्रशासन कोरोना महामारी व्यवस्थापन कार्यात व्यस्त आहे. वर्दळ अल्प आहे. आठवडे बाजार बंद आहे. मात्र, बाजारतळ आवारात सुरू असणाऱ्या अनधिकृत कामांचे वास्तव तक्रारींकडे स्थानिक पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आधीच बाजारकरूंना जागा नसल्याने ते महामार्गालगत ठाण मांडतात. त्यामुळे दुतर्फा रस्ता कोंडी होते. पोलिसांचेही अस्तित्व जाणवत नाही. या परिस्थितीमुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे मनोधैर्य तीसगाव शहरात वाढत असल्याची खंत गारूडकर यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
---
अनधिकृत बांधकामांचा विषय तीसगाव शहरात अनेकदा गाजतो. महामार्गालगतच्या सिमेंट काँक्रीटच्या गटारी, ओढे, विश्रामगृहाच्या समोर गट नंबर ९६ अशा विविध ठिकाणी होणारी पक्की बांधकामे भविष्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढविणार आहेत. याला वेळीच पायबंद घालावा.
-बाळासाहेब लवांडे,
माजी अध्यक्ष, तीसगाव सेवा संस्था