उक्कलगाव : तालुक्यातील उंदीरगाव ग्रामपंचायतीत सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद पेटला आहे. विरोधी सदस्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत सरपंच व उपसरपंच यांना कोंडून घेतले. अखेर अशोक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर वाद मिटला. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके व योगिता निपुंगे यांनी ग्रामपंचायतीत कोणतीही विकास कामे वेळेवर व चांगल्या दर्जाची होत नसल्याचा आरोप केला. ग्रामस्थांना वेळेवर पाणी मिळत नाही. सार्वजनिक शौचालय पाच महिन्यांपासून बंद ठेवले. त्यामुळे संतप्त होत विरोधी सदस्यांनी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके हे कार्यालयातच होते.
या प्रकाराची माहिती मिळताच सुरेश गलांडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चर्चा करून विरोधकांची समजूत काढली. त्यानंतर कुलूप उघडले गेले. यावेळी दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक, मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे उपस्थित होते.
--------