साहेबराव नरसाळे / नानासाहेब चेडेअहमदनगर : गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेची चाके अखेर २०१७ मध्ये फिरली़ मात्र, शासन निर्णयाची मेख बसल्यामुळे ही भरती पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात रुतली आहे़ त्याचवेळी टीईटी, महाटेटची (अभियोग्यता चाचणी) अग्निपरीक्षा दिलेल्या उमेदवारांना संस्था चालकांच्या मुलाखतीचे(?) दिव्य पार पाडावे लागणार आहे़ महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलाखतीला फाटा देणाºया सरकारने खासगी संस्थांना मुलाखतींचे अधिकार बहाल करुन गैरप्रकारांनाच निमंत्रण दिले आहे़ त्यातही गुणांची स्पष्टता नसल्यामुळे उमेदवारांचा संभ्रम अधिकच वाढला आहे़२३ जून २०१७ मध्ये शिक्षक भरती जाहीर झाली़ त्यानुसार पवित्र पोर्टलवर उमेदवारांना आॅनलाईन नोंदणी करण्यास सांगण्यात आले़ डिसेंबर २०१७ मध्ये महाटेटची परीक्षा झाली़ महाटेट परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड यादी जाहीर होईल, या प्रतीक्षेत उमेदवारांना पुन्हा सरकारने गॅसवर ठेवले़ तब्बल वर्षभर गॅसवर असलेल्या उमेदवारांना २०१९ मध्ये शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्याचा हुकूम आला़ ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया पार पडते ना पडते तोच पुन्हा एसईबीसी व दिव्यांग उमेदवारांच्या जागांबाबत नवा आदेश काढून सरकारने भरतीवर ‘स्ट्राईक’ केला़ आता पुन्हा दिव्यांग व एसईबीसी वर्गाच्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार सुधारित बिंदूनामावलीसाठी भरती प्रक्रियेचा गाडा रुतून पडला आहे़ अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे़ आचारसंहिता जाहीर झाल्यास ही भरती प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार आहे़महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांवर मुलाखत रद्द करुन थेट नियुक्ती देण्यात येणार आहे़ मात्र, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांवर नियुक्ती देताना मुलाखती अनिवार्य करण्यात आल्या आहेत़ या मुलाखतींचे अधिकारही संस्थांकडे सोपविण्यात आले आहेत़ किती गुणांची मुलाखत होणार, याचीही स्पष्टता नाही़ त्यामुळे संस्था चालकांच्या हाती खुले रान सोपविण्यात आले आहे़ यातून संस्था चालकांचे ‘हात ओले’ केल्याशिवाय नियुक्तीच मिळणार नाही, अशी धास्ती उमेदवारांमध्ये आहे़ त्यामुळे डीएड, बीएडची परीक्षा, त्यानंतरची टीईटी आणि नंतर घेतलेली महाटेट अशा परीक्षांची काठिण्य पातळी पार केलेल्या उमेदवारांसमोर पुन्हा संस्था चालकांच्या मुलाखतींचे दिव्य पार पाडण्याचे आव्हान आहे़ या निर्णयावरुन उमेदवारांमध्ये चीड निर्माण झाली आहे़शिक्षणमंत्र्यांना निवेदनगुणवत्ता असलेल्या अभियोग्यताधारक (महाटेट उत्तीर्ण) उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे़ त्यातून आत्महत्यांची प्रकरणे समोर येत आहेत़ त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार आहे, असे निवेदन डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना दिले आहे.२ आॅगस्ट रोजी पुढील निर्णयराज्यात १२ हजार १४७ जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ त्यासाठी राज्यभरातून १ लाख २४ हजार शिक्षकांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली होती़ महाटेटमधून ८३ हजार ७०० शिक्षक पात्र ठरले आहेत़ या सर्व शिक्षकांनी पवित्र पोर्टलवरच शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविला आहे़ मात्र, खासगी संस्थांना मुलाखतीचे किती गुण देण्याचे अधिकार आहेत, दिव्यांग व एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणामुळे होणारा जागांमधील बदल कसा असेल, अशा प्रश्नांनी उमेदवारांना संभ्रमात टाकले आहे़ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसंदर्भात पुढील निर्णय २ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी सूचना झळकत आहे़ हा निर्णय काय असेल, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे़शिक्षकभरतीची प्रक्रिया अंतिम टप्यात आलेली असताना एसईबीसीच्या शासन निर्णयाने शिक्षकभरतीवर अनिश्चिततेचे सावट पसरलेले आहे़ संपूर्ण राज्यातील सर्व शिक्षण संस्थांचा विचार केला असता एसईबीसी प्रवर्गात अंदाजे बारा टक्के जागा आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या काही ठराविक संस्थांमध्ये सध्या घटकानुसार जागा रिक्त आहेत त्या कायम ठेवून त्या जागेचे संतुलन या पुढील होणाºया भरतीप्रक्रियेत करण्यात यावे. बदलासाठी भरती प्रक्रिया न थांबता या आरक्षणाच्या प्रमाणानुसार भरती पूर्ण करावी़ -संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडन्ट असोसिएशन, महाराष्ट्रटेट पात्रता आणि महाटेट परीक्षेतील गुणवत्ता सिद्ध केली असूनही आता खाजगी शिक्षण संस्थेत निवडीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन परीक्षा उत्तीर्ण होऊनही शिक्षक होण्यासाठी मुलाखतीतील गुण निर्णायक ठरणार आहेत. मात्र यात पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापनाची हमी नाही. -कल्पेश खैरनार, उमेदवार
‘पवित्र’चा खासगी संस्थांंशी ‘अपवित्र’ रिश्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 4:55 PM