अहमदनगर : व्हीआरडीई स्थलांतरीत होऊ नये यासाठी पंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, डिफेन्स कमिटीचे सदस्य शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. सोमवारी रात्री राजनाथ सिंह यांनी मला फोन करून व्हीआरडीई स्थलांतरीत करणार नाही, असे आश्वासन दिले, अशी माहिती माजी खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
गांधी म्हणाले, व्हीआरडीई स्थलांतरीत करण्याचा संरक्षण खात्याचा प्रस्ताव होता. ही माहिती स्थानिक अधिका-यांना होती. त्यामुळे त्यांनी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. खा. सुजय विखे यांनीही पाठपुरावा केला. मी वैयक्तिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्य मंत्री श्रीपाद नाईक, डिफेन्स कमिटीचे सदस्य शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठपुरावा केला.
सोमवारी रात्री ९.३० वाजता राजनाथ सिंह यांनी याबाबत माझ्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना नगरला व्हीआरडीई राहणे किती महत्वाचे आहे, याची माहिती दिली. त्यामुळे सिंह यांनी व्हीआरडीई स्थलांतरीत होणार नसल्याचे सांगितले.
काही प्रकल्पाचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव होता. तोही स्थानिक पातळीवर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले.