देवदैठण : देवदैठण (ता. श्रीगोंदा)-पाडळी (ता. पारनेर) रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने देवदैठण येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले.देवदैठण व पाडळी रांजणगाव या दोन गावांना जोडणा-या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक वर्षापासून रस्त्याची दुरवस्था असून दुरुस्तीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही, असे म्हणत देवदैठणच्या ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. सोमवारी सकाळी ३० तरुणांनी रक्तदान केले. अशा आंदोलनानंतरही प्रशासन ऐकणार नसेल तर २० फेब्रुवारीपासून रास्ता रोको, बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.विश्वास गुंजाळ, वसंत बनकर, निलेश गायकवाड, विजय कोकाटे, रवींद्र ढवळे, संतोष वेताळ, सुरेश उबाळे आदींसह गावक-यांनी रक्तदान करून आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.देवदैठण ग्रामस्थांचे निवेदन मिळाले. या रस्त्यासाठी विशेष लक्ष घालून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांनी संयम राखावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले. अनेक वर्षापासूनची आमची रस्ता डांबरीकरणाची मागणी आहे. राजकीय नेते, प्रशासनाकडून नुसतेच आश्वासन मिळते. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष घातले नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देवदैठणच्या उपसरपंच जयश्री गुंजाळ, पूजा बनकर यांनी सांगितले.
रस्ता दुरुस्तीसाठी रक्तदान करुन अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 4:06 PM