हेमंत आवारी अकोले : शहरातील लाँड्री व्यावसायिक गणेश बबन बोऱ्हाडे या तरुणाने गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचा तिरंगी झेंडा कॅलेंडर मशीनद्वारे कोणतेही शुल्क न घेता प्रेस व पॉलिश करून दिले आहेत. माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शाळांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे. प्रभात व गणेश लॉंड्रीचे संचालक बोऱ्हाडे यांच्या या आगळ्यावेगळ्या राष्ट्रभक्तीची चर्चा तालुक्यात आहे.
गतवर्षी २६ जानेवारीला बोऱ्हाडे यांनी ३५ शाळांना ही सुविधा विनामूल्य दिली. यंदा किमान ५५ ते ६० शाळांनी या योजनेचा लाभ घेतला असे लाँड्री समोरील मराठी शाळेचे शिक्षक वसंत आहेर यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांचे झेंडे देखील त्यांनी प्रेस व चकदार पॉलिश करून दिले आहेत. गेली अनेक वर्षांपासून तिरंगी झेंडे इस्त्री करून देण्याची परंपरा बोऱ्हाडे यांनी जपली आहे. सैन्यदलातील जवान यांचा पोशाख विनामूल्य इस्त्री प्रेस करून देण्याची परंपरा बोऱ्हाडे कुटुंबाने जपली आहे. गतवर्षी त्यांनी स्टीम प्रेस पॉलिशचे मशीन घेतले. यामुळे कमी वेळेत अकोलेतील जनतेला सुविधा उपलब्ध झाली आहे.
झेंड्याला मशिनच्या मदतीने स्टीम प्रेस, पॉलिश व रोल प्रेस केले जात असल्याने तिरंगी ध्वजास चमकदार झळाळी मिळते. झेंडे नव्यासारखे दिसतात आणि त्यांचे आयुष्य वाढते. सिन्नर-संगमनेर तालुक्यातील काही शाळा व शासकीय कार्यालयांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. सोमवारी एका दिवसात ४२ झेंडे प्रेस पॉलिश करून दिले. गतवर्षीपेक्षा यंदा शाळांचा प्रतिसाद चांगला होता. तिरंगी झेंड्यांना व सैनिकांचे पोशाख यांना मोफत इस्त्री करून देण्याचे आजोबांच्या काळापासून सुरू आहे.
सीमेवर जवान उभे असल्याने आपण सुरक्षित ही भावना आजोबांनी जपली. ती परंपरा माझी तिसरी पिढी जपत आहे. आता शालेय शिक्षण घेत असलेला मुलगा ही परंपरा पुढे नेईल, असा विश्वास आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतले पण नोकरी केली नाही. मी हा पारंपरिक व्यवसाय जपला आहे. -गणेश बोऱ्हाडे, लाँड्री संचालक, अकोले.
आमच्या शाळेला नवा झेंडा घ्यायचा होता. दोन दिवसापूर्वी शिक्षक व्हॉटस ॲप ग्रुपवर झेंडे प्रेस पॉलिशचा संदेश वाचला. बोऱ्हाडे यांनी झेंडा चमकदार करून दिला .झेंड्याचे आयुर्मान वाढले. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून अनोखी राष्ट्रभक्ती ते जपत आहेत.-रेखा लावरे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निळवंडे.