अहमदनगर : विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदी होतात हे विद्यापीठातील डाळिंब आणि ऊस संशोधनाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर कृषी अवजारांची निर्मिती करणे गरजेचे आहे. राज्य शासन फळलागवडीला प्रोत्साहन देत आहे; पण उत्पादित फळांच्या मूल्यवर्धनावर भर देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना सोमवारी मंत्री भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव मोहन वाघ, रावसाहेब खेवरे, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, विशेष कार्यकारी अधिकारी रफिक नाईकवाडी, सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. आनंद सोळंके यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुसे यांनी विद्यापीठातील फॉरेज कॅक्टस प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, बांबू संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, कृषी अवजारे प्रकल्प, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान प्रकल्पाला भेट दिली. यावेळी भुसे म्हणाले, विद्यापीठ स्थापन होऊन ५२ वर्षे झाली असून, विद्यापीठाचे तंत्रज्ञान अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. १९९५ साली बांबू लागवडीचे मिशन हे शेतकऱ्यांनी सुरू केले होते. पालघरच्या आदिवासी भगिनींनी बांबू प्रक्रियेवर चांगले काम केले आहे.
विद्यापीठाच्या ९५३ हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प आदर्शवत असून, या प्रकल्पाद्वारे १२३ टी.एम.सी. पाण्याची साठवणूक जमिनीत झाली आहे. या प्रकल्पामुळे या प्रक्षेत्रावर कर्बाचे प्रमाण किती वाढले, मातीची सुपीकता, जमिनीची सुधारणा यासंदर्भात अभ्यास केला जात आहे, अशी माहिती पोपटराव पवार यांनी दिली.
---
फोटो - ०७ दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अवजारांची पाहणी केली. समवेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. अशोक ढवण आदी.