अरुण वाघमोडे / नागेश सोनवणे । अहमदनगर : हल्ली लग्नसोहळा, वाढदिवस अथवा इतर खासगी कार्यक्रमांत ड्रोन कॅमे-याच्या सहायाने फोटो व शुटिंग घेण्याचा ट्रेंड वाढत आहे़. हे ड्रोन कॅमेरे उडविताना मात्र व्यावसायिक शासकीय परवानगीच घेत नसल्याचे समोर आले आहे़. आकाशात विनापरवाना उडणा-या या ड्रोनमुळे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी होऊन सुरक्षितता धोक्यात येऊ शकते़. भारतात ड्रोनच्या वापरांवर कडक निर्बंध आहेत. ड्रोन किंवा ड्रोन कॅमेरांचा सर्वाधिक वापर हा सशस्त्र सेना, निमलष्करी दल, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती निवारण दलांकडून केला जातो. पोलिसांना ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर महसूल विभागाकडून परवानगी घ्यावी लागते़. जिल्ह्यात मात्र गेल्या काही वर्षांत विनापरवाना खासगी कार्यक्रमांत सर्रास ड्रोन कॅमेरे उडताना दिसतात़ नगर शहरात लष्कराची महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच भंडारदरा, मुळा डॅम ही धरणे तर शिर्डी, शनिशिंगणापूर हे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. या परिसरातही खासगी कार्यक्रमांसाठी ड्रोन कॅमेरे वापरले जातात. खासगी कार्यक्रमासाठी ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेकडून परवानगी घ्यावी लागते़. प्रत्यक्षात मात्र महसूल विभागाकडे पोलिसांनी मोर्चासाठी अथवा इतर शासकीय कार्यक्रमांसाठी ड्रोनबाबत परवानगी घेतल्याचे दिसून आले आहे़. खासगी कार्यक्रमासाठी एकानेही परवानगी घेतलेली नाही़. ड्रोनसाठी महसूल विभागाकडून परवानगी घेताना पोलिसांनाही माहिती देणे आवश्यक असते़. प्रत्यक्षात मात्र या परवानगीकडे ड्रोन कॅमे-याचा व्यवसाय करणारे आणि कार्यक्रम घेणा-यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे़. विनापरवाना ड्रोन उडविणा-यांवर प्रशासनाकडूनही अद्यापपर्यंत काहीच कारवाई झालेली दिसत नाही़. असा होऊ शकतो गैरवापर ड्रोन म्हणजे वैमानिकरहित छोटेखानी विमाऩ विमान, हेलिकॉप्टर अथवा इतर वाहन जेथे जाऊ शकत नाही. तेथे ड्रोन सहज पोहोचते़ या ड्रोनला हाय डेफिनिशनचे कॅमेरे जोडता येतात. मोकळा परिसर, इमारत, धार्मिक ठिकाणे अथवा धरण आदी परिसराचे या ड्रोनच्या सहाय्याने सहज फोटो अथवा शुटिंग काढता येते़. ड्रोनचा आकार लहान असतो़ आवाजही कमी होतो़. त्यामुळे या ड्रोनचा सहजरित्या कुणीही गैरवापर करू शकतात़. जिल्ह्यात विनापरवाना उडणारे हे ड्रोन प्रशासनाने अद्यापपर्यंत तरी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही़. ड्रोन कॅमेरा २५० ग्रॅम व त्यापेक्षा कमी वजनाचा असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र यापेक्षा जास्त वजनाचा ड्रोन असेल तर त्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे़.
ड्रोन उडविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेकडून परवानगी घ्यावी लागते़. विनापरवाना ड्रोन उडविल्याची तक्रार प्राप्त झाली तर गृहशाखा संबंधितांवर कारवाई करण्याची शिफारस पोलिसांकडे करते़, असे नायब तहसीलदार राजू दिवाण यांनी सांगितले.