केडगाव :
नगर तालुक्यातील निंबोडी, दरेवाडी व सारोळाबद्दी परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले.
कैऱ्यांनी लगडलेल्या आंब्याच्या झाडांना गारपिटीचा तडाखा बसला. झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला. सध्या परिसरात गहू कापणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी गहू शेतातच उभा आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू भुईसपाट झाला. कापणी झालेल्या गव्हाच्या पेंढ्यांवर गारांचा सडा पडला. गहू भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कडब्याच्या गंजी रचून ठेवल्या आहेत. हा कडबा पूर्णपणे भिजला आहे. त्याचबरोबर संत्रा बागांबरोबरच डाळिंबाच्या बागेलाही हानी पोहोचली आहे. डाळिंबाला आलेला बहर गारपीट झाल्याने गळाला आहे.
गारपिटीमुळे शेतातील कांदा पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे कोसळली. नुकसान झालेल्या पिकांसह फळबागांचेही पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---
२१ नगर पाऊस, १
वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने नगर तालुक्यातील सारोळाबद्दी, दरेवाडी येथे शेतात गारांचा पडलेला सडा.
दुसऱ्या छायाचित्रात कापणी झालेल्या गव्हाच्या भिजलेल्या पेंड्या.