शिर्डी : स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी प्रशासनाने निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे शिर्डी शहर परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिर्डीत बेघर, बेरोजगार कामगार, कचरा वेचक, भिक्षेकरी आदी गरजुंना संस्थानकडून बसस्थानकात दोन वेळचे जेवण देण्यात येत होते. मात्र या कामगारांच्या स्वच्छतागृहांचा व व्यक्तीगत स्वच्छतेचाही प्रश्न होता. यामुळे सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येणाची शक्यता होती़ चार दिवसात येथे जेवणारांची संख्या पंधरा वरून चारशेवर पोहचली होती. या पार्श्वभूमीवर चिंतीत झालेल्या प्रांताधिकारी गोविंद शिंद ेयांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायत मुख्याधिकारी सतिष दिघे, प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांच्याशी विचारविनीमय करून या बेघर लोकांना बंदिस्त जागेत ठेवून सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साईपालखी निवारा यांच्या व्यवस्थापनाला विनंती करण्यात आली. आजवर पायी येणा-या पदयात्रींना विनामूल्य भोजन व निवास व्यवस्था पुरवणारा साई पालखी निवारा व्यवस्थापनाने मानवतेच्या भावनेतून सहर्ष अनुमती दिली. येथे या लोकांची उत्तम व्यवस्था होणार आहे. मात्र त्यांना प्रशासनाच्या अनुमतीशिवाय बाहेर पडता येणार नाही. या लोकांना ठेवण्यासाठी संस्थेचे दोन मोठे हॉल अधिगृहीत करण्यात आले आहेत. यामुळे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.बेघर व स्थलांतरीत होत असलेल्या लोकांना येथे ठेवण्यात येणार आहे. साईबाबा संस्थान येथे दोन वेळचे जेवण पुरविणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने ६२जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना या निवारा केंद्रात दाखल केल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
शिर्डीत बेघरांसाठी प्रशासनाकडून अद्यावत निवारागृह; अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 8:07 PM