कर्जत : जिल्ह्यातील पहिल्या शासकीय हमीभाव उडीद व मूग खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ होते.कर्जत तालुक्यातील उडीद व मूग खरेदीसाठी शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी शेतक-यांची मागणी होती. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्या होत्या. हमी भाव खरेदी केंद्र कर्जत येथील गजानन सेवा सहकारी संस्थेला मंजूर करण्यात आले. हे उडीद व मूग खरेदी केंद्र कर्जत- कुळधरण रोडलगत असलेल्या तूर खरेदी केंद्राच्या जागेवर सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी गेल्या वर्षी ५६ कोटी रुपयांची तुरीची खरेदी करण्यात आली होती. यामुळे यावेळीही संपूर्ण उडीद व मूग खरेदी वेळेत केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, कुळधरणचे सरपंच अशोक जगताप, बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल, नगरसेवक डॉ. संदीप बरबडे, काका धांडे, रावसाहेब खराडे, आजिनाथ परहर, पोलीस पाटील समीर जगताप तसेच शेतकरी उपस्थित होते.
शेतक-यांच्या वेळेत बचत
या केंद्रावर शेतक-यांना रांगा लावण्याची गरज नाही. नोंदणी आॅनलाईन पद्धतीने असल्यामुळे नंबर येताच शेतक-यांना मेसेज येईल. शिवाय धान्यांची पट्टी शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. यामुळे शेतक-यांच्या वेळेत बचत होईल.आतापर्यंत येथे तीन हजार शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. उडीद व मूग यांच्या प्रतवारी साठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज केली आहे. शेतक-यांनी स्वच्छ, वाळलेला माल आणावा, असे आवाहन खरेदी केंद्राचे अध्यक्ष विठ्ठल पिसाळ यांनी केले.