अहमदनगर : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी केली असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचाराचा खटला ठेवला गेला व त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. माजी मंत्री नवाब मलिक यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांनाही तुरुंगात डांबण्यात आले.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली असून नगरचे माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशी लावण्यात आली. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याबाबत हे सुरु आहे. सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करुन भाजप विरोधकांना छळत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अंबादास गारुडकर, अशोकराव बाबर, किसनराव लोटके, बाबासाहेब तरटे, रोहिदास कर्डिले, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, केशव बेरड, आरिफ शेख, फारूक रंगरेज, गजानन भांडवलकर, वैभव महस्के, रत्नाकर ठाणगे आदींची नावे आहेत.