पाचेगाव : नेवासा तालुक्यातील गावागावात लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या आठवडाभरातील तीन टप्प्यात पाचेगावातील शंभर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
गावातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी नेवासा बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. केंद्रात पहाटेपासून नागरिक रांगा लावत असल्याने ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत होता. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या अनेक गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावागावात लसीकरण करावे, अशी मागणी तालुका आरोग्य यंत्रणेकडे केल्यानंतर गत आठवडाभरापासून आरोग्य विभागाकडून गावागावात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
आतापर्यंत तीन टप्प्यात दोनशे नागरिकांनी मागणी नोंदवली.
लसीकरणाच्या दिवशी टोकन पद्धतीने सोडत काढून लसीच्या उपलब्ध डोसनुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. गावासाठी लसीचे डोस उपलब्ध व्हावे, अशी मागणी सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच श्रीकांत पवार, ग्रामसेवक कारभारी जाधव, अशोकचे संचालक दिगंबर तुवर, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, सदस्य वामन तुवर, अशोकराव नांदे यांनी केली आहे.
लसीकरणासाठी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. संदीप भालेराव, आशासेविका रेणुका मांजरे, मनीषा साळुंके, पाटोळे, ग्रामपंचायत कर्मचारी सत्तार पटेल, रामेश्वर पवार, उमेश कहार आदींचे सहकार्य मिळाले.