श्रीरामपूर : मासिक पाळीदरम्यान कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का, गर्भवती व स्तनदा मातांच्या लसीकरणाचे काय? हे सर्वच महिलांना सध्या पडणारे सर्वसाधारण प्रश्न आहेत. मात्र, नैसर्गिक बाब असलेल्या मासिक पाळीमध्ये लस पूर्णतः सुरक्षित असल्याचे मत सरकारी यंत्रणा आणि डॉक्टरांनी नोंदविले आहे. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना लसीकरणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशभरात आता अठरा वयाच्या पुढील सर्वच नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचेच लसीकरण केले जात होते. मात्र, असे असले तरी अद्यापही गर्भवती व स्तनदा मातांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यावरून देशभरामध्ये तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.
जगातील काही देशांमध्ये मात्र गर्भवती व स्तनदा महिलांचे लसीकरण केले जात आहे. भारत सरकारने मात्र त्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही. मासिक पाळीमध्ये लस घेणे हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याबाबत कुठलाही पूर्वग्रह न ठेवता लस घेण्याचे आवाहन सरकारद्वारे केले जात आहे. त्यासाठी प्रबोधन मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
---
पुरेसे संशोधन नाही
गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना सरसकट लस द्यावी याकरिता अद्याप पुरेसे संशोधन व सांख्यिकी माहिती जमा झालेली नाही. त्यामुळे ठोस निष्कर्षाप्रत संशोधन पोहोचलेले नाही. या कारणाने सध्या अशा स्त्रियांचा लसीकरण मोहिमेत समावेश झालेला नाही.
----
जिल्ह्यातील महिलांचे लसीकरण
एक लाख ७७ हजार ३६९.
फ्रंटलाइन वर्कर्स (महिला) - १४ हजार
-----
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या फॉगसी या संघटनेने गर्भवती व स्तनदा महिलांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी का, यावर विचारमंथन केले आहे. लस घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारकडे त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा संघटना विचार करीत आहे.
सुरेखा जोशी,
स्त्रीरोगतज्ज्ञ, श्रीरामपूर.
----
गर्भवती महिला, स्तनदा माता यादेखील ही लस घेऊ शकतात. पोटातील बाळावर आणि अंगावर दूध पिणाऱ्या बाळावर फारसा काही परिणाम होत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन लसीकरण करून घ्यावे. लस घेण्याचे फायदे अधिक आणि नुकसान कमी आहे. मासिक पाळीच्या काळातदेखील ही लस घेतली तरी चालते.
डॉ. शालिनी योगेंद्र सचदेव,
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, संगमनेर