सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द, बुद्रुक या दोन्ही गावातील अंत्योदय योजनेसह प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून स्वस्त दरातील धान्य पुरवठा बंद आहे.पुरवठा निरीक्षक मंदाकिनी साबळे यांच्याशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती पुढे आली. आॅनलाईन नोंदणी झाल्याशिवाय संबंधीत लाभार्थ्यास स्वस्त धान्य वितरित केले जात नाही. आॅनलाईन नोंदणीसाठी दोन्ही गावातील लाभार्थ्यांनी कागदपत्रे स्वस्त धान्य दुकान चालकांकडे दिले. परंतु त्यांची नोंदणी होऊ शकली नाही. कारण ते सर्व्हर महिन्याभरापासून बंद असल्याचे पुरवठा निरीक्षक सांगतात. नोंदणी नसल्याने स्वस्तातील धान्य नाही. मोलामहागाचे घेण्याची त्यांची ऐपत नाही. गरीब असल्याने कोणी उधार उसणवार देत नाही. अशा गरजू लाभार्थ्यांवर प्रशासनाच्या गलथानपणामुळे उपाशी दिवस काढण्याची वेळ आल्याचे वाघुंडे खुर्दचे सरपंच संदीप मगर यांनी सांगितले.स्थानिक वादविवादामुळे हे स्वस्त धान्य दुकान रूई छत्रपती येथील दुकानदाराकडे वर्ग झाले. परगावावरून येण्यास लागणारा विलंब. त्यात लाभार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी, कागदपत्रांबाबत अपुरी माहिती, बंद असणारे सर्व्हर अशा चक्रव्यूव्हात लाभार्थी सापडले आहेत. तालुक्यातील इतर गावातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे हे सर्व्हर तातडीने चालू होणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तोपर्यंत आॅफलाईन धान्य पुरवठा करण्याची मागणी सरपंच मगर यांनी केली आहे .योजनेतील लाभार्थ्यांना दोन रुपये प्रति किलो दराने गहू व तीन रुपये प्रति किलोने तांदूळ दिला जातो. त्यामुळे अल्प, अत्यल्प व निराधार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजघटकासाठी वरदान असणारी ही योजना आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याकाठी १९ किलो गहू व १६ किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यास माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जात असल्याची माहिती दुकान चालक प्रकाश पठारे यांनी दिली.आॅफलाईन धान्य वाटपास परवानगी नाहीपारनेर तालुक्यात अंत्योदयचे २ हजार ३१२, प्राधान्य कुटूंब ४८ हजार ५६५ लाभार्थी आहेत. काही लाभार्थिंची आॅनलाईन नोंद झाली. उर्वरित लाभार्थ्यांची संख्या सर्व्हर बंद असल्याने सांगता येत नाही. महिन्यापासून सर्व्हर बंद आहे. आॅफलाईन धान्य वाटपास परवानगी नाही. सर्व्हर चालू झाले तरच आॅनलाईन नोंदणी सुरू होईल. त्यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र देणार आहोत.- मंदाकिनी साबळे, पुरवठा निरीक्षक, पारनेर