अहमदनगर/अकोले: अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. पिचड भाजपवासी होणार की शिवसेनेत जाणार याकडे तालुक्यातील पिचड समर्थकांसह सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी वैभव पिचड यांनी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट घेतली. तर बुधवारी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र युती झाल्यास अकोलेची जाग सेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे सेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.आमदार पिचड गेली महिनाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. सव्वा महिन्यानंतर दोन दिवसापूर्वी ते अकोलेत आले होते. ‘लोकमत’ने त्यांना पक्ष बदलाविषयी छेडले असता, त्यांनी आता फक्त भगवा शर्ट घालायचा बाकी ठेवलंय. असा उपरोधिक टोला लगावत पक्ष बदलाच्या वृत्ताचा इन्कार केला होता. आमदार पिचड मुंबईला जाताच पुन्हा पक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा तालुक्यात धडकली. राष्ट्रवादी, सेना, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी खासगीत त्यास दुजोराही दिला आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमदार पिचड यांच्या सोबत मुंबईत आहेत. मंगळवारी मातोश्रीवर आणि बुधवारी वर्षा बंगल्यावर मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने भाजप व सेनेच्या प्रमुख नेत्यांशी आमदार पिचड व त्यांच्या समर्थकांची पक्ष बदलाबाबत वाटाघाटीची चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.
आज राष्ट्रवादीच्या मुलाखतीअहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती आज घेण्यात येणार आहेत. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात या मुलाखती पार पडणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीला जिल्ह्यातील नेमके कोण-कोेण उपस्थित राहणार हेही पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.