अहमदनगर : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’, या कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या ओळी सध्या गुणगुणल्या जात आहेत. व्हॅलेंटाईन वीक असल्याने दररोज वेगवेगळे ‘डे’ सध्या साजरे होत आहेत. प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि भेटवस्तू वेगवेगळ्या असल्या तरी गुलाबाच्या फुलांना सर्वच दिवस मागणी वाढली आहे. येथील बाजार समितीमध्ये गुलाबाचे दर सध्या तरी स्थिर आहेत; मात्र मागणीसोबतच आवकही वाढली आहे. किरकोळ बाजारात सध्या एका गुलाबाला १० रुपये असा दर आहे.
दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. सात दिवस आधीपासूनच हा प्रेमाचा सप्ताह साजरा केला जातो. ७ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत दररोज एक डे साजरा होत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटले की प्रेमसागराला सगळीकडेच उधाण आलेले आहे. प्रेमवीर हे प्रेयसीला गुलाबासह विविध भेटवस्तू देऊन एकमेकांवरील प्रेम पक्के करतात. असे असले तरी सध्या लग्न झालेले आणि न झालेले असे सर्वच एक उत्सवाप्रमाणे व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. त्यामुळे सध्या गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्येही गुलाबाच्या फुलांची आवक वाढत आहे. यंदाचा व्हॅलेंटाईन डे रविवारी आल्याने अनेकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी मोकळीक मिळणार आहे. त्यामुळेच गुलाबफुलांचीही मागणी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सध्या गुलाबाचा ठोक दर १५ रुपये प्रती गड्डी आहे. एका गड्डीत पाच फुले असल्याने तीन रुपयांना एक गड्डी मिळते. किरकोळ बाजारात सध्या १० ते १५ रुपयांचा एक फूल मिळते.
------------
असे आहेत डे
७ फेब्रुवारी- रोज डे
८ फेब्रुवारी- प्रपोज डे
९ फेब्रुवारी -चॉकलेट डे
१० फेब्रुवारी-टेडी डे
११ फेब्रुवारी- प्रपोज डे
१२ फेब्रुवारी- हग डे
१३ फेब्रुवारी- किस डे
१४ फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे
------------------
असे आहेत फुलांचे ठोक भाव
फुलाचा प्रकार आवक सरासरी दर
गुलाब ११४० गड्डी १५ रुपये (प्रती गड्डी)
गुलछडी २३८ किलो १७० रुपये किलो
गलांडा ३१९ किलो ३५ रुपये किलो
झेंडू ५९० किलो ३५ रुपये किलो
आस्टर २९५ किलो ३५ रुपये किलो
डच गुलाब २०४ जुडी १३० रुपये जुडी
जरबेरा १७५ जुडी २७ रुपये जुडी
--------------
एरव्ही १० ते १५ रुपयांना असणारा डच गुलाब सध्या २० ते २५ रुपयांना विकला जात आहे. लाल गुलाबाची १० फुलांची गड्डी ४० ते ५० रुपयांना आहे. पहिला दिवस रोज डे असल्याने गुलाबाच्या फुलांना चांगली मागणी होती. रविवारपर्यंत ही मागणी वाढणार असून, गुलाबाच्या गुच्छांनाही चांगली मागणी आहे.
- सचिन भुतारे, विक्रेते