महर्षी व्यासांच्या समकालीन ऋषी श्री दलादन मुनी यांनी दत्त महात्म्यपर लिहिलेल्या व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी संशोधित केलेल्या संस्कृत स्तोत्रांचा मराठी अनुवाद प्राचार्य रमेश भारदे यांनी ‘दत्तलहरी’ या पुस्तक रूपाने केला आहे. या साहित्यकृतीचे प्रकाशन साधकाश्रम आळंदी येथील चिदंबरेश्वर महाराज साखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पाश्चात्त्यांच्या विकृतीचे अंधानुकरण न करता आपल्या धर्म संस्कृतीचा आदर्श विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी कार्यक्षम बनवणारे शिक्षण शाळेतून मिळायला हवे.
अध्यक्षस्थान माजी प्राचार्य एस. व्ही. कुलकर्णी त्यांनी भूषवले. यावेळी भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले, वारकरीभूषण राम महाराज झिंजुर्के, अजित देशपांडे, अरुंधती देशपांडे, वृंदा कुलकर्णी, बापूसाहेब भोसले, मुकुंद कुलकर्णी, श्यामसुंदर भारदे, हरीश भारदे, प्रसाद भारदे, प्राचार्य मदन मुळे, भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.
रमेश भारदे म्हणाले, माझी भाची अरुंधती हिच्या विनंतीवरून मला हे लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. उत्कट प्रेमभक्तीची उत्कृष्ट अभिव्यक्ती दत्तकृपेने माझ्या लेखणीतून साकारली हे मी माझे भाग्य समजतो. महाराष्ट्रातील सर्व दत्तमंदिरांपर्यंत हे पुस्तक पोहोचावे आणि दत्त साधकांना यातून प्रेरणा मिळावी हीच अपेक्षा.
यावेळी अरुंधती अजित देशपांडे यांच्याकडून शाळेला दीड लाख रुपये किमतीचे आर.ओ. वॉटर फिल्टर भेट देण्यात आले. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने रमेश भारदे यांचा सन्मान करण्यात आला. मच्छिंद्र मगर, प्रतिभा शेळके, अरुण भारस्कर, अतुल रासने यांना पुस्तक प्रकाशन व ध्वनिमुद्रण कामी सहकार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारदे विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. नीलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. उमेश घेवरीकर यांनी आभार मानले.