केडगाव : घरातील महिला आनंदी, निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. महिलांनी गृहकर्तव्य बजवताना स्वत:च्या आरोग्याबाबतही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रकृतीच्या छोट्या तक्रारीकडेही वेळीच लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे. आरोग्याचे वाण ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांनी केले. नगर तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे चास (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिलांसाठी ‘वाण आरोग्याचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या भोर, भांबरे, डॉ. निवेदिता माने, डॉ. छाया नन्नवरे, डॉ. चाबूकस्वार, चास ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सदस्या प्रतिभा डावखरे, वर्षा शिंदे, दीपाली देवकर, उमेद अभियान बचत गटाच्या सुनीता देवकर आदी उपस्थित होत्या. परिसरातील मळगंगा महिला समूह गट, वैष्णवी महिला समूह गट, नाथकृपा महिला समूह गटातील महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन सुनीता देवकर यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आलेल्या सर्व महिलांची तपासणी करण्यात आली.
फोटो : ३१ चास
चास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाण आरोग्याचा कार्यक्रमप्रसंगी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.