अहमदनगर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा. तसेच विडी विक्री करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विडी कामगार महिलांनी घरामधूनच लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये तीन हजार महिलांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी घरोघरी विडी कामगारांनी लाक्षणिक उपोषण केले. नगर शहरातील श्रमिकनगर,तोफखाना, दातरंगेमळा, शिवाजीनगर, भराड गल्ली, पद्मानगर, टांगे गल्ली, झारेकर गल्ली आदी शहराच्या विविध भागात विडी कामगारांनी आपल्या राहत्या घरी लाक्षणिक उपोषण केले. विडी मालकांनी लॉकडाऊन काळात केंद्र व राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य विडी विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने सदरील मनाई मागे घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत. परिणामी विडी कामगारांना काम मिळणार नाही. यामुळे विडी कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आंदोलनात कॉ. शंकर न्यालपेल्ली, अॅड. सुधीर टोकेकर, शंकरराव मंगलारप, कॉम्रेड बहिरनाथ वाकळे, संगीता कोंडा, कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, सरोजनी दिकोंडा, बुचम्मा श्रीमल, निर्मला न्यालपेल्ली, शामला म्याकल, सुमित्रा जिंदम, लिला भारताल, शोभा बीमन, शमीम शेख, सगुना श्रीमल, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम आदी सहभागी झाल्या होत्या.
नगरमध्ये विडी कामगार महिलांचे घरातूनच उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:38 AM