संगमनेर : कोरोना महामारीच्या संकटात विडी कामगारांचा रोजगार ठप्प झाला असून, विडी कामगारांना शासनाकडून आर्थिक अनुदान मिळावे, यासाठी विडी कामगार व पद्मशाली समाज मंडळ, संगमनेर यांच्यातर्फे रविवारी (दि. २३) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिल २०२१पासून दोन टप्प्यात महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासनाकडून लोककल्याणकारी अनेक उपाय करण्यात आले आहेत. मात्र, यात विडी कामगारांचा समावेश करायला हवा होता. संपूर्ण महाराष्ट्रात विडी कामगारांची संख्या खूप मोठी आहे. विडी कामगार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, रोजंदारीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यांची रोजंदारी ४५ ते ५० दिवस बंद राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना चरितार्थ चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विडी कामगारांना किमान पाच हजार रुपये आर्थिक अनुदान मंजूर करावे व विडी कामगारांच्या परिवारांना उपासमारीपासून वाचवावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. पद्मशाली समाज मंडळाचे अध्यक्ष नारायण ईट्टप, समाज मंडळाचे उपाध्यक्ष सुनील मादास व पापय्या सिरसुल्ला, माजी नगरसेवक गणेश मादास, शांताराम आडेप, शंकर चन्ना, सचिन अंकाराम, अंबादास आडेप, युवक संघटना अध्यक्ष रवींद्र उडता, आदी यावेळी उपस्थित होते.