उमेश कुलकर्णी, पाथर्डी: तालुक्यातील मिडसांगवी येथे आज सकाळी मनोज जरांगे यांचे नऊ वाजता आगमन झाले. या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यानंतर मनोज जरांगे हे खरवंडीच्या दिशेने रवाना झाले.
खरवंडी येथे जरांगे यांच्या पदयात्रा जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. जरांगे यांच्या समवेत आलेल्या मराठा आंदोलकांची भोजनाची व्यवस्था तालुक्यातील टाकळी फाटा व आगासखांड येथे करण्यात आली असून या ठिकाणी पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यातील अनेक गावातून भाजी, भाकरी चटणी, लोणचे बुंदी मसाला भात साबुदाण्याची खिचडी असे विविध खाद्यपदार्थ आणण्यात आले असून एक तासानंतर जरांगे यांच्या पदयात्रेचे टाकळी फाटा येथे आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आमदार मोनिका राजळे राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे उपस्थित आहेत. टाकळी फाटा येथे जरांगे यांचे आगमन होताच त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात येणार असून स्वतः जरांगे हे आगसखंड येथे भोजन करणार आहेत. या ठिकाणी छोटे खानी स्टेज उभारण्यात आले असून या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनसमुदायाला जरांगे यांनी संबोधित करावे, असा त्यांना आग्रह करण्यात येणार आहे.