अहमदनगर : पीएम फंडातून नक्की किती व्हेंटिलेटर आले, याचा आकडा जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पीएम फंडातून जिल्हा रुग्णालयाला ८०, ६८ की फक्त १२ व्हेंटिलेटर मिळाले, याबाबतच्या आकडेवारीमध्ये घोळ दिसून आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही नक्की किती व्हेंटिलेटर कार्यरत आहेत, याचा पत्ता नसल्याचे दिसून येत आहे.
संपूर्णपणे भारतात तयार झालेल्या व्हेंटिलेटर्सचे गतवर्षी सर्व जिल्ह्यांत वाटप करण्यात आले. पीएम केअर्स फंडातून ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. त्यातील गतवर्षी १२ व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली होती. एका अधिकाऱ्याने जिल्हा रुग्णालयाला ८० व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती दिली आहे. गतवर्षी केंद्र सरकारकडून आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट होते, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यामुळे सध्या किती व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित आहेत, याबाबत घोळ आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात फक्त ३३६ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालयात ७० ते ८० व्हेंटिलेटर आहेत. त्यातील बरेचसे नादुरुस्त आहेत.
कोरोनाच्या अनेक रुग्णांना प्रसंगी व्हेंटिलेटर्सवर ठेवावे लागते. त्यामुळे त्यांची कमतरता भासू नये, यासाठी भारतातच व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ३१०० कोटी रुपयांचा पीएम केअर फंड असून, त्यापैकी दोन हजार कोटी रुपयांतून हे व्हेंटिलेटर्स देशात तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशभरात हे व्हेंटिलेटर्स वितरित करण्यात येत आहेत.
----
जिल्ह्यात एकूण व्हेंटिलेटर- ३३६
पीएम फंडातून मिळालेले -१२
जिल्हा रुग्णालयात नवे -६८
----------
जिल्हा रुग्णालयात पीएम फंडातून गतवर्षी ६८ व्हेंटिलेटर मिळालेले आहेत. सर्व व्हेंटिलेटर सुस्थितीत असून, त्यावर रुग्ण उपचार घेत आहेत. सर्व व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजनही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक
--
नेट डमी
११ व्हेंटिलेटर डमी
व्हेंटिलेटर