अहमदनगर :
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन बदलीचा लाभ घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करणार आहे. या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी कालपासून (मंगळवार) सावली दिव्यांग संघटनेने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. आता सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने संघटनेने हे आंदोलन मागे घेतले आहे.
सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र दिल्याने बीडमध्ये जवळपास ७८ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातही संवर्ग एकमध्ये दिव्यांग शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यातही बीडप्रमाणेच बोगसगिरी झाल्याचा संशय असल्याने जिल्हा परिषदेने या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांद शेख, संभाजी गुठे, बाहुबली वायकर, बाबासाहेब डोळस, राजू दुसुंगे आदी दिव्यांग बांधवांनी मंगळवारपासून (दि.२८) जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेत बदली झालेल्या सर्व २९९ दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी १ मार्च रोजी आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.