हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाने हे निर्देश दिले आहेत.
नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट) यांनी भाजपचे डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा २८,९२९ मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे एकूण ८ आणि राज्य विधानसभेबाबतचे ३ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांवर निवडणूक आयोग ४५ दिवस प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.
फेरमतमोजणी होणार नाही, केवळ मशिन तपासणारबंगळूर येथील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट निर्मिती करणाऱ्या बेल कंपनीच्या अभियंत्याकडून निश्चित केलेल्या दिवशी ४० मतदान केंद्रांवरील बॅलेट कंट्रोल युनिट (बीयू), व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशिन या यंत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? एवढेच तपासले जाईल. फेरमतमोजणी केली जाणार नाही, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
या मतदान केंद्रांवर होणार तपासणी शेवगाव (५), राहुरी (५), पारनेर (१०), अहमदनगर शहर (५), श्रीगोंदा (१०) आणि कर्जत जामखेड (५).