अहमदनगर: इगतपुरी तालुक्यातील (जि. नाशिक) आदिवासी समाजातील पाच ऊस तोडणी मजुरांकडून पाथरवाला (ता. नेवासा) येथे वेठबीगारी करून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षक आमदार कपील पाटील यांनी शुक्रवारी (दि.८) विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, श्रमजीवी संघटनेच्या तत्परतेमुळे या मजुरांची वेठबीगारीतून मुक्तता झाली. या प्रकरणी नेवासा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.गंगाराम त्रिंबक वाघ (वय ३५, रा. कावणे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांनी याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पंकज खाटीक (रा. पाथरवाला, ता. नेवासा), खाटीक याच्या ट्रॅक्टरचा चालक (त्याचे नाव माहीत नाही) अशा दोघांविरोधात भादंवि कलम ३७४, बंधबीगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६ चे कलम १६, १७, १८ यासह ॲट्रॉसिटी अंतर्गत शुक्रवारी (दि.८) गुन्हा दाखल केला.
कावणे (ता. इगतपुरी) येथील गंगाराम वाघ व त्यांची पत्नी अलका, आई नभाबाई, भाऊ राहुल, बिंदास असे कुटुंब गावातील ऊस तोडणी मजुरांच्या टोळीबरोबर एक महिन्यापूर्वी ऊस तोडणीसाठी पाथरवाला येथे आले होते. ऊस तोडणीचे काम येथील पंकज खाटीक यांच्या शेतात सुरू होते. त्यामुळे वाघ व इतर मजूर तेथे कोप्या करून राहत होते. तेथील मालकाने त्यांना ठरल्याप्रमाणे उचल म्हणून दोन हजार रूपये दिले होते. मात्र नंतर त्यांनी उर्वरित पैसे दिले नाहीत. दरम्यान, या मजुरांकडे पैसे न राहिले नाहीत. त्यांच्याकडील धान्यही संपले. त्यामुळे मजुरांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे त्यांनी गावी इगतपुरीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गुरुवारी (दि.७) गावाहून पीकअप (छोटा टेम्पो) बोलाविला. त्यामध्ये संसारोपयोगी साहित्य भरले. मात्र पंकज खाटीक व त्याच्या ट्रॅक्टरचा चालक यांनी पीकअप अडविला. पुढे जाल तर वाहन पेटवून देईल, असे खाटीक याने धमकावल्याचे वाघ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
इगतपुरी येथील कातकरी समाजातील कुटुंबाबाबत नेवासा तालुक्यात वेठबिगारीचा गंभीर प्रकार घडला असून याबाबत विधान परिषदेत आपण प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी यात तत्काळ कारवाई केली नाही. ज्यांनी त्यांना वेठबीगारीसाठी आणले व रात्रभर अडवून ठेवले. तसेच घटनेची माहिती मिळून कारवाई न करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी.-कपील पाटील, आमदार, विधान परिषद