राहुरी : राज्याचे लक्ष वेधलेल्या राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या पदाला औरंगाबाद येथील खंडपिठात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती ढवळे यांच्यापुढे दाखल करण्यात आलेले अपिल फेटाळण्यात आल्यामुळे कुलगुरूंना दिलासा मिळाला आहे.कुलगुरू या पदासाठी डॉ. के. पी. विश्वनाथा हे अपात्र असल्याचे अपिल राहुरी येथील बाळासाहेब जाधव यांनी गेल्या वर्षी केले होते. महाराष्ट्र कषि विद्यापीठ अधिनियम-१९८३ नुसार कुलगुरू या पदासाठी डॉ. विश्वनाथा हे अपात्र असल्याचे अपिल करण्यात आले होते. कुलगुरूंना विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षाचा अनुभव नसताना निवड करण्यात आल्याचे अपिलात म्हटले होते.महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिफारस शोध समितीच्या तज्ञांनी केली आहे. राज्यपालांनी निवड केली आहे. समितीने त्यावेळी संशय घेतला नव्हता. राज्यपालांनी त्यानंतर निवड जाहीर केली होती. त्यामुळे न्यायालयाने हे अपिल फेटाळून लावले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले. कुलगुरू विश्वनाथा यांच्या निवडीला येत्या ३१ डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.कुलगुरूंचा अनुभव पूर्ण नसल्याची तक्रार बाळासाहेब जाधव यांनी सुरूवातीला महाराष्ट्र शासनाकडे केली होती. शासनाने दखल न घेतल्याने औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती. कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांच्यावतीने अॅड. धोर्डे यांनी काम पाहिले. बाळासाहेब जाधव यांच्यावतीने अॅड. डी. एम. शहा यांनी काम पाहिले.
राहुरी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांना औरंगाबाद खंडपिठाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 5:45 PM