शिर्डी : कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम शासनाला अंधारात ठेवून बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. हा निर्णय कृषी महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा असून त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून निर्णय मागे घ्यावा व कुलगुरूंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.विखे-पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र पाठवून तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम बंद करण्याच्या निर्णयाने होणाऱ्या परिणामांची वस्तुस्थिती विषद केली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून कृषितंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नसतानाही अभ्यासक्रम बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला आहे.