लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: कोरोना महामारीत शेतीक्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला तारले. परंतु, कोरोनाच्या नव्या लाटेत बळीराजाच कोरोनाचा बळी ठरू पाहत आहे. शेतकऱी कुटुंब कोरोनाने हैराण असून, कुटुंबाला कोरोनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी कुुटुंबप्रमुखाची धडपड सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण नगर शहरात १२ मार्च २०२० मध्ये आढळला होता. गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांचा आकडा काही हजारांवर पोहोचला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. परंतु, शेतीची कामे सुरू होती. शेतकऱ्यांचा इतरांशी संपर्क येत नव्हता. परंतु, कोरोनाच्या नव्या लाटेने ग्रामीण भागाला विळखा घातला. जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात गावात वाड्या वस्त्यांवर राहणारे शेतकरी कुटुंब कोरोनाचे बळी ठरल्याची उदाहरणे आहेत. शहरी भागातील नागरिक आरोग्याबाबत जागृत असतात. आरोग्याचा विमा उतरविण्यात शहरी मंडळी पुढे आहेत. या उलट स्थिती ग्रामीण भागात आहेत. आरोग्याचा विमा नसल्याने त्यांना रुग्णालयात पाय ठेवण्याआधीच पैशांची सोय करावी लागत आहे. कमीतकमी २५ हजार रुपये भरावे लागतील, असे रुग्णालयांकडून सांगितले जाते. ही रक्कम उभी करायची कशी. त्यात संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह आल्याने एवढ्यांची उपचारासाठी पैसे आणायचे कुठून असे एक ना अनेक प्रश्न पॉझिटिव्ह आलेल्या कुटुंबांना भेडसावत आहे.
....
विमा नसल्याने बळीराजा हतबल
कोरोनाने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाना विळखा घातला आहे. संपूर्ण कुटंब पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले असून, आरोग्याचा विमा नसल्याने उपचारासाठी लाखो रुपये उभे कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.
...