नेवासा : राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. सोमवारी सायंकाळी ८ वाजता तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे जाऊन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी सकाळी शनि शिंगणापूर येथील देवस्थानच्या होम कुंड येथे शनि अभिषेक केला. यावेळी त्यांच्यासमवेत अॅड. सुनील चावरे, हेमंत त्रिवेदी, डॉ. विक्रम चोभे, डॉ. अनुपा चौभे, प्रभाकर अंजुरकर, भगवान झा यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. देवगड येथे साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, तप्त असलेल्या भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल हे सत्य युगापासून सुरू आहे. महाराष्ट्र ही संत, राष्ट्भक्तांची व शिवरायांची भूमी आहे. संत हे सहनशील असतात. पण संत वचन हे देवाची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या याच भूमीत संतांना आणून त्रास दिला गेला. त्यामुळे त्या राज्यकर्त्यांचा नाश झाला. राष्ट्रभक्ती, देवभक्ती ही देवांची हत्यारे मानव जातीच्या, श्रृष्टी व धर्म रक्षणासाठी वापरली जातात. समाजाने सुद्धा ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपले सर्व जीवन राष्ट्रभक्तीसाठी व धमार्साठी अर्पण आहे. बाबरी पाडण्यासाठी ही मी होते. राम मंदिर निर्मितीसाठी ही आपण राहणारच असून राम मंदिर होणारच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्ञानेश्वरी वाचताना माझ्या जीवनातील अनेक प्रश्न सुटण्यास मला मदत झाली. तर देवगड येथील रम्यभूमी मला पुन्हा येथे येण्यास भाग पडणार आहे. मंगळवारी सकाळी शनि अभिषेक केल्यानंतर शनि चौथ-यावर जाऊन शनि दर्शन घेतले. शनिदेवाला तेल अर्पण केले. यावेळी देवस्थानाच्यावतीने जनसंपर्क कार्यालयात अध्यक्षा अनिता शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनि प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी विश्वस्त शालिनी लांडे, आदिनाथ शेटे, राजेंद्र लांडे, भागवत बानकर उपस्थित होते.
भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल; देवगड येथे साध्वी प्रज्ञा सिंह यांची भविष्यवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:59 PM