कृषी विभागाच्या वतीने विविध २८ कामांसाठी १९ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार अभियंत्यांनी या कामांसाठी रितसर निविदा भरल्या. परंतु, त्यानंतर तीन-चार दिवसांतच कृषी विभागाने कोणतेही कारण न देता आधीच्या निविदा रद्द करून पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे अभियंत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय अनेक जण कामापासून वंचित राहतील, त्यामुळे स्मायलिंग अस्मिता शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. फेरनिविदा करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेरोजगार सुशिक्षित विद्यार्थ्यांचा बळी घेऊ नये, अशी अपेक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी व्यक्त केली.
संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांच्याशी चर्चा करण्यात आली. परंतु, कोणतेही ठोस कारण त्यांनी दिले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते.
तोडमल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भातील माहिती आम्ही रक्ताने पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवणार आहोत. यावेळी सचिन सापते, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दरेकर, कृष्णा कुंदुरकर आणि विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
--------
फोटो मेल २६ स्मायलिंग
कृषी विभागाने जाहीर केलेल्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ स्मायलिंग अस्मिता संघटनेच्या वतीने कृषी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.