अनिल साठे
शेवगाव (जि. अहमदनगर) : आतापर्यंत आपण रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पांदण, डोंगराळ भागातून, नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल.! मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही, शेवगाव तालुक्यातील आपेगावंकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.
तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत. गावातून वाहणाऱ्या ढोरा नदी पात्रामुळे गाव विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नसल्याने, वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना, धोकादायक जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय. ही जल प्रवासाची अत्यंत धोकादायक वेळ, आपेगाव येथील लहानमुलांसह वृद्ध आणि महिलांवर आहे. हा प्रवास करताना अनेक वेळा यात बुडून मरण्याचा धोका झाल्याचे, तसेच दोघा जणांचा पाय घसरुन मृत्यू झाल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात.
या गावातील अण्णासाहेब बोरुडे यांनी सांगितले, की छाती इतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणं जाणं करावं लागतंय. आमच्या लेकरांना शाळेत पाठवतांना काळजावर दगड ठेऊन पाठवावे लागते आहे, मात्र आमची दया कोणालाही येईना झाली. राहुल शेळके म्हणाले आजवर पाय घसरुन दोघांचा जीव गेला, मात्र कोणालाही दया आली नाही. अद्यापही आम्ही पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी सोबत भांडतो आहोत मात्र आश्वासनाच्या पलीकडे काही मिळाले नाही. अन्य मार्गाने जायचे म्हटले तर सहा किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागतो आहे.
ग्रामस्थ म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडणूक आली कि येतात आणि भाऊ, दादा, काका, ताई आम्हाला मतदान करा, आम्ही पूल देऊ म्हणतात. मात्र पुन्हा येत नाहीत. केवळ आम्हाला पूल द्यावा हीच आमची मागणी आहे. रस्ता नसल्यामुले येथील शाळकरी दादा शेळके म्हणाला, की मात्र माझे पप्पा आजरी आहेत. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसतं. शाळेत जायचे म्हटले की पालकांना कामधंदा सोडून सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जातांना भीती वाटते, कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळा देखील बुडते अशी खंत 'दादा' या चिमुकल्याने व्यक्त केली.
लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनास आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार आहे का ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके, आदी ग्रामस्थांनी पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणूक दरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.