अहमदनगर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील तर संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार आघाडीवर आहेत. तर पालकमंत्री राम शिंदे जामखेडमधून तर पारनेरमधून सेनेचे विजय औटी, अकोलेतून वैभव पिचड पिछाडीवर आहेत. शिर्डी, संगमनेर, कर्जत-जामखेड, अकोले मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. शिर्डी मतदारसंघात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ३० हजार मतांनी आघाडीवर होते. तर संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे १२ हजार मतांनीआघाडीवर होते. कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. अकोले मतदारसंघातून माजीमंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड हे पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे हे १० हजार मतांनी आघाडीवर होते. पारनेरमधून शिवसेनेचे नेते विजय औटी हेही पिछाडीवर होते. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेतली. शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे आघाडीवर आहेत. माजीमंत्री बबनराव ढाकणे यांचे ते चिरंजीव आहेत. कोपरगाव मतदारसंघातून आमदार स्रेहलता कोल्हे याही पिछाडीवर आहेत. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे आघाडीवर आहेत. आशुतोष काळे हे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आहेत. राहुरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे २३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत. प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव आहेत.
विधानसभा निवडणूक निकाल : भाजपचे शिर्डीतून राधाकृष्ण विखे तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर; कर्जत-जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:18 AM