अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने विखे यांची राजकीय कोंडी झाली आहे.अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेसला याचा अद्याप निर्णय झाला नाही. सुजय विखे भाजपात जाणार असल्याच्या मध्यंतरी चर्चा होत्या. मात्र नगरची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले. डॉ. सुजय विखे हे राष्ट्रवादीत आल्यास त्यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी जिल्ह्यात चर्चा आहे. मात्र आता दोन्ही पवारांनी विखे यांच्याशी संपर्क झालाच नसल्याची कबुली दिल्याने विखे पिता-पुत्र राजकीय कोंडीत सापडले आहेत.आ. अरुण जगताप यांनीही मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांची भेट घेतली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे आ. जगताप यांनी पवार यांना सांगितले. मात्र, आ. जगताप यांची भेट स्वत:साठी होती की सुजय विखे यांच्यासाठी? हे गुलदस्त्यातच आहे.>विखे यांच्याशी चर्चाच नाही- शरद पवारडॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच मंगळवारी पुणे येथे माध्यमांशी बोलताना खुलासा केला. ते म्हणाले, मी विखे पाटलांना अद्याप भेटलोच नाही. सुजय विखे राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविणार असल्याची बातमी मी वर्तमानपत्रातूनच वाचतो आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. पवार यांच्या या नव्या गुगलीमुळे विखे यांची कोंडी झाली आहे.
विखे यांची राजकीय कोंडी, जगतापही पवारांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 5:16 AM