अहमदनगर : खा. डॉ. सुजय विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील सहकारी साखर कारखान्यांनी तातडीने ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. प्रकल्प उभारणीचे काम सुरू केल्याचे या दोन कारखान्यांनी सहकार आयुक्त कार्यालयास कळविले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. दररोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी रुग्णालयांकडून केली जात आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत नसल्याने जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला असून, सहकार आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यात एकूण साखर कारखान्यांची संख्या २३ आहे. यापैकी २२ साखर कारखान्यांनी चालूवर्षी गाळप केले. यापैकी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. या दोन्ही कारखान्यांनी तसे पत्र सहकार आयुक्त कार्यालयास दिले असून, प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहे. उर्वरित सहकारी साखर कारखान्यांनी मात्र सहकार खात्याचा आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अधिपत्याखालील सहकारी कारखान्यांची संख्या मोठी आहे; परंतु या कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काेरोनाच्या संकट काळात कारखान्यांनी पुढे येऊन मदत करावी. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, कारखान्यांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे आवाहन केले होते; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
....
दिवसभरात ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध
जिल्ह्याला सोमवारी दिवसभरात विविध प्रकल्पांमधून ५३ मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. हा ऑक्सिजन रुग्णालयांना समप्रमाणात वाटप करण्यात आला आहे. ऑक्सिजन वाटपासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, नायब तहसीलदारांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक प्रकल्पांवर चोवीस तास ठाण मांडून आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली ऑक्सिजनचे वाटप होत असल्याने गेल्या दोन दिवसांत तक्रारींचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्रशासानाकडून सांगण्यात आले.