लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कर्जतमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक आंबादास पिसाळ व मिनाक्षी साळुंके यांच्यात झाली असली तरी अप्रत्यक्षपणे लढत आमदार रोहित पवार व खासदार डॉ. सुजय विखे यांच्यातच होती. या निवडणुकीत पिसाळ यांनी विजय मिळविल्याने विखे यांनी एकप्रकारे रोहित पवार यांना धक्काच दिला आहे.
लोकसभा व विधानसभेनंतर पहिल्यांदाच मोठी सार्वत्रिक निवडणूक झाली. जिल्हा बँकेची निवडणूक सर्व प्रस्थापितांसाठी महत्वाची असते. जामखेडमध्ये विखे यांचे समर्थक अमोल राळेभात हे बिनविरोध निवडून आले. कर्जतमध्ये साळुंके यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली हाेती. आमदार रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या नेते मंडळींनी सूत्रे हलविली. राज्यात सत्तेत असून, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महसूलमंत्री थोरात हे पक्षाचे श्रेष्ठी आहेत. मात्र ते त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना निवडून आणू शकले नाहीत.
जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जत तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांना ३७, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते मिळाली. महाविकास आघाडीकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बँकेच्या निवडणुकीची सूत्रे होती. त्यांनी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काळे- कोल्हे आणि मुरकुटे -ससाणे यांच्यात समझोता घडवून आणला. परंतु, काँग्रेसच्याच जिल्हाध्यक्षांना बिनविरोध निवडून आणू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. जामखेडमध्ये अमोल राळेभात यांना बिनविरोध निवडून आणण्यात पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्जतमध्येही पवार यांनी साळुंके यांच्या पाठीमागेही ताकद उभी केली होती. पवार यांच्याकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मतदारांना बारामतीच्या सहलीवर रवाना करण्यात आले हाेते, अशी कर्जतमध्ये चर्चा आहे. असे असताना साळुंके यांना ३६ च मते मिळाली. खासदार डॉ. सुजय विखे हे संसदेच्या अधिवेशनात व्यस्त होते. अधिवेशन संपल्यानंतर विखे यांनी कर्जतमध्ये तळ ठोकला होता. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन शेवटच्या टप्प्यात विखे यांनी मोर्चेबांधणी केली. या तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार असल्याने जिल्हा बँकेची जबाबदारी अर्थातच राष्ट्रवादीवरच होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेेंद्र फाळके हेही कर्जत तालुक्यातीलच आहेत. रोहित पवार व फाळके यांनी साळुंके यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु, त्यांना आपला उमेदवार निवडून आणण्यात अपयश आल्याने महाविकास आघाडीची एक जागा कमी झाली.
....
कर्जत नगरपरिषदेवर परिणाम
कर्जत नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर आहे. ही निवडणूक तोंडावर असतानाच कर्जत तालुक्यात जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पवार यांच्या वर्चस्वाला धक्का बसला असून, त्याचे पडसाद नगरपरिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळतील. याचा अर्थ पवारांची एकहाती सत्ता कर्जतकरांनाही मान्य नसल्याचेच या निकालातून स्पष्ट होते.