अहमदनगर : महापौर निवडणुकीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दीप चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची, तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन माहिती दिली; परंतु चर्चा पुढे सरकली नाही. दरम्यान खा. डॉ. सुजय विखे यांनीही संख्याबळाचे कारण देऊन एक प्रकारे महापौर निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता महापौर पदाचा चेंडू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच कोर्टात असल्याचे बोलले जाते.
महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाल येत्या ३० जून रोजी संपणार आहे. महापालिकेने महापौर निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. त्यावर निर्णय झाला नसला तरी राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. खा. डॉ. सुजय विखे यांनी राज्यात जसे आमचे संख्याबळ नाही, तसे अहमदनगर महापालिकेतही नाही, असे सांगून एक प्रकारे भाजप महापौर निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे भेट घेऊन माहिती दिली. मात्र, चर्चेचा तपशील समजू शकला नाही. चव्हाण यांनी चर्चा सकारात्मक झाली असल्याचे सांगून सर्वकाही राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याच हातात असल्याचेही सांगितले आहे. सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. ही भेट वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी असली तरी या भेटीत महापौर निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेस आणि पाठापोठ सेनेने जिल्ह्यातील या मंत्र्यांच्या महापौर निवडणुकीबाबत माहिती देऊन वरिष्ठ पातळीवर भूमिका मांडण्याचे साकडे घातले आहे; परंतु या दोन्ही मंत्र्यांनी महापौर पदाबाबत उघडपणे बोलणे टाळलेले दिसते. महाविकास आघाडी यातून भक्कम असल्याचेच आधोरेखित होते; परंतु वरिष्ठ पातळीवर आपापल्या पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडण्याचे अश्वासन हे मंत्री देऊ शकत होते. मात्र, तेही त्यांनी दिलेले दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांच्या भेटीतून फारसे काही निष्पन्न झाले असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
......
राष्ट्रवादी वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत
महापालिकेत सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून भाजप व राष्ट्रवादीची मैत्री आणखी घट्ट झाली. आगामी महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नाही; परंतु राष्ट्रवादीकडे उमेदवार असूनही, थांबा आणि पाहा, अशीच काही भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली दिसते. राष्ट्रवादीला वरिष्ठ पातळीवरून महापौर पदाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे. सेना व काँग्रेसने महापौर पदावर दावा केला आहे; परंतु त्यांच्या पक्षाचे मंत्री महापौर पदासाठी फारसे उत्सुक नसल्याचेच या गाठीभेटीवरू दिसते.