श्रीरामपूर : सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतक-यांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील मांजरी, टाकळीमियॉ, देवळालीप्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे आयोजित जाहीर सभांमध्ये मुरकुटे बोलत होते. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मत धुमाळ, माजी सभापती सुनीता गायकवाड, अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे, जि.प.सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गणेश भाकरे उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले, राहुरी तालुक्यातील ३२ गावांमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी आपल्या हक्काचा आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून कांबळे यांची निवड करण्यात आली. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे या भागाचे वाटोळे झाले. उसाची शेती उदध्वस्त होऊन राहुरी कारखाना बंद पडला. त्याचा परिणाम देवळालीप्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील बाजारपेठ ओस पडण्यात व कामगारांचे प्रपंचाची धूळधाण होण्यात झाला. विखे यांच्या प्रयत्नाने कारखाना सुरु झाला तरी पाटपाण्याच्या अशाश्वतेमुळे भवितव्य टांगणीवरच आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस उमेदवार लहू कानडेंवर टीका केली. विखे व मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आपल्यावर विरोधक टीका करत आहेत. मात्र आमदारकीच्या काळात आपण भरीव विकास कामे केली. विकासासाठीच आपण सेनेसोबत आलो असून, येथील नेत्यांची भक्कम साथ आहे, असे ते म्हणाले. यावेळी किसनराव बडाख, अच्युतराव बडाख, निवृत्ती बडाख, गणपतराव कोल्हे, नामदेव बडाख, लक्ष्मण बडाख, ज्ञानेश्वर बडाख, दीपक बडाख, जालिंदर बडाख, हरिभाऊ बडाख उपस्थित होते.
श्रीरामपूर मतदारसंघाच्या विकासासाठी विखेंशी मैैत्री-भानुदास मुरकुटे; कांबळेंच्या प्रचारार्थ राहुरीत सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:19 PM