लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यात मोग्रस गावात गेल्या साठ वर्षांत एकदाही निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत साठ वर्षांपासून तर सेवा सोसायटी पन्नास वर्षांपासून बिनविरोध होत आहे. यंदा गावातील तीन वाॅर्डांत सात जागांसाठी गावाची बैठक पार पडली. त्यात आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले.
मोग्रस गावात गेल्या साठ वर्षांपासून एकही निवडणूक झाली नाही. १९६० पूर्वी धामणगावपाट व मोग्रस ही ग्रुप ग्रामपंचायत विभक्त झाली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची एकही निवडणूक झाली नाही. त्यामुळे गावात वाद, गट, तंटा या भानगडी नाहीत. जिल्ह्यात या गावाला जिल्ह्यातील हगणदारी मुक्ती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, वन व्यवस्थापन, तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले आहेत. गावची दोन हजार लोकसंख्या असताना खुर्चीचे भांडण गावात कधीच नाही. गावात सतत एकाच कुटुंबात किंवा एकाच व्यक्तीला पद दिले जात नाही. गावचा निर्णय झाल्यानंतर कुणीही ठरलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त अर्ज दाखल करत नाही.
.........
गावाने गेली साठ वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा चालवली, ती पुढे चालू राहावी. गावातील एकीने मी अकोले पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकलो. ग्रामपंचायतीचे सर्वच पुरस्कार व विकास निधी यामुळे सहज मिळाले.
- भानुदास गायकर, माजी सभापती
...........
गावातील बैठकीत निर्णय घेताना तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही समान संधी दिली जाते. पक्ष, गट-तट बाजूला ठेवतात. यंदा तरुणांना संधी देण्याचे ठरले. त्यानुसार गावाचा बिनविरोधचा निर्णय ठरला. मोग्रस गावात आजपर्यंत एकही निवडणूक झाली नाही.
- सीताराम गायकर, अध्यक्ष, मूळमाता देवस्थान, मोग्रस