पळवे
: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर येथे चार महिन्यांपासून वायरमनच नाही. येथील शेतकरी स्वतः जीव धोक्यात घालून विजेची दुरुस्ती करतात, अशी माहिती सरपंच डॉ.विलास काळे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे वारंवार वीज खंडित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे, असेही काळे यांनी सांगतले.
यावर्षी पाण्याची पातळी चांगली असल्याने शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच भुईमूग वाटाणा, जनावरांसाठी कडवळ तसेच तरकारीची पिके घेतली आहेत. यासाठी वेळोवेळी भरणे करावी लागतात. त्यात विजेचा लपंडाव सुरू असतो. रोहित्र बिघडणे, वीज खंडित होण्याचा प्रकार होत असतो. अशा वेळेस या गावासाठी वायरमनच नसल्याने खासगी वायरमनला बोलावून कामे करावी लागतात. त्यासाठी त्यांना नाहक खर्च करावा लागतो. रात्री अपरात्री स्वत: शेतकरी जीव धोक्यात घालून वीज दुरुस्तीची कामे करतात. हे वारंवार होत असल्याने तसेच पिके वीज पाणीअभावी सुकू लागली आहेत. तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू असल्याने लाईट गेली तर दोन दोन दिवस लाईट येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असेही म्हसणे गावचे सरपंच डॉ. विलास काळे यांनी कैफियत मांडली. तरी येथे तातडीने वायरमनची नियुक्ती करावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही डॉ. काळे यांनी दिला आहे.
...
नवीन वायरमनची मागणी
सहायक अभियंता श्रेयस रुद्राकर यांच्याशी संपर्क साधला असता येथील वायरमनची चार महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. यामुळे येथील चार्ज शेजारच्या वायरमनकडे दिला आहे. त्या वायरमनकडे अगोदरच सहा गावे असल्याने त्यास कार्यभार जास्त होत आहे. यामुळे त्यास वेळेवर सेवा देता येत नाही. शासनाकडे वायरमनची मागणी केली असल्याचे रुद्राकर यांनी सांगितले.
....