तालुक्यातील इंदोरी येथील ३० वर्षीय युवक सागर भाऊसाहेब नवले याचा रोड अपघातात मृत्यू झाला. कोल्हार-घोटी महामार्गाच्या धिम्या गतीने सुरू असलेले काम कारणीभूत असल्याचा दावा करत मयताच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी व रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी इंदोरीकर ग्रामस्थांसह तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी पानओहळ येथे आंदोलन छेडले.
सागर याचा महिनाभरापूर्वी याच रस्त्यावर पानओहळ या ठिकाणी खड्डा चुकवताना मोटारसायकल अपघात झाला होता. बुधवारी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अकोले तालुका हद्दीतील काम महिन्याभरात पूर्ण झाले पाहिजे. वाहतुकीला अडथळा करणारे रस्त्याच्याकडेचे विजेचे खांब योग्य जागी हटवा. कळस हद्दीत रस्ता कामासाठी तयार केलेला खड्डा तातडीने दुरुस्त करा. अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबांना मदत करा. अपघातात जखमी झालेल्यांनाही ठेकेदाराने मदत करावी, अशा मागणी यावेळी करण्यात आली.
जेष्ठ नेते अशोक भांगरे, इंदोरीचे उपसरपंच वैभव नवले, ग्रामपंचायत सदस्य निखिल नवले, जगन देशमुख, माजी सरपंच संतोष नवले, सीताराम नवले, चंद्रभान नवले, सचिन जोशी, भानुदास तिकांडे, प्रदीप हासे, बबन वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड प्रतिबंध नियम पाळून आंदोलन छेडण्यात आले. महेश नवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
अशोक भांगरे, मिनानाथ पांडे, वसंत मनकर, मारुती मेंगाळ, अशोक देशमुख, सुरेश नवले, प्रमोद मंडलिक, संदीप दराडे यांची भाषणे झाली. तहसीलदार यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारली.
..................
महिनाभरात काम होणार पूर्ण
ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत तहसील कार्यालयात बैठक घेऊ, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी आश्वासन दिले. महिन्याभरात अकोले तालुका हद्दीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करू. त्याखेरीज रस्त्याच्या कामाची यंत्रसामग्री दुसरीकडे जाणार नाही, असा शब्द सार्वजनिक बांधकामाचे उपविभागीय अभियंता जगदीश कडाळे यांनी दिला.
आंदोलनानंतर लगेच पानओहळ येथे रस्त्याच्या कामास सुरुवात झाली.