राहुरी: गावातून होत असलेल्या वाळू उपशाला कंटाळून धानोरे येथील ग्रामस्थ स्मशानभूमीत उपोषणास बसले आहेत. दरम्यान आज (दि.४ आॅक्टोबर) तिस-या दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरूच होते.
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील धानोरे गावातील ग्रामस्थांचे हे वाळूच्या संदर्भातील तिसरे उपोषण आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब दिघे व त्यांचे सहकारी वाळू चोरीच्या संदर्भात उपोषणास बसले होते. त्यावेळेस प्रशासनाकडून दखल घेऊन सर्कल पी.बी. शिंदे, तलाठी मच्छिंद्र रहाणे यांनी पंचनामा करून साधारण वाळू उपसा झाल्याचे निदर्शनास आणले.
या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून दंड वसूल केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.
दरम्यान आज तिस-या दिवशीही ग्रामस्थांचे स्मशानभूमीत सरणावर बसून उपोषण सुरू होते. उपोषणस्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे. उपोषणस्थळी तिस-या दिवशीही कोणीही महसूलचा अधिकारी फिरकला नाही. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.