टाकळी ढोकेश्वर : खडकवाडी (ता. पारनेर) येथे पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खडकवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी विद्युत उपकेंद्राच्या कर्मचा-यांना दोन तास कोंडले. दरम्यान, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य सचिव किरण वाबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. खडकवाडी भागात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. वारंवार होणारा खंडित वीज पुरवठ्यामुळे गावकरी, शेतकरी त्रस्त झाले होते. विजेअभावी पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. कमी, अधिक होणा-या वीज पुरवठ्यामुळे कृषिपंप जळाले आहेत. तसेच गावाला पाणीपुरवठा करणा-या योजनेचा पंपही पुरेशा विजेअभावी चालत नाही. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकड पाठपुरावा केला. महसूल प्रशासनालाही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने खडकवाडी ग्रामस्थांचा उद्रेक झाला. काही कार्यकर्त्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती यांना अक्षरश: गाडीत बसवून आंदोलनस्थळी आणले. त्यानंतर दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकर्त्याना देण्यात आले. आंदोलनात गणेश चौधरी, रवी ढोकळे, राजू रोकडे, विकास रोकडे, अमोल रोकडे, दिलीप ढोकळे, धनंजय ढोकळे, आप्पा शिंदे, देवराम हारदे, भाऊ जाधव, सुनील गागरे, सबाजी गागरे तसेच शेतकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सध्या सुप्यावरून खडकवाडी उपकेंद्राचे व्होल्टेज वाढविले आहे. पुढील महिन्यात वारणवाडी येथे उपकेंद्र होणार असल्याने खडकवाडी उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. तसेच बाभुळवाडे येथे चार ते पाच महिन्यात उपकेंद्र होणार आहे. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर व खडकवाडीला उच्च दाबाने वीजपुरवठा होईल.-मंगेश प्रजापती, उपकार्यकारी अभियंता