केडगाव : नगर - पुणे रस्त्यालगत असणा-या कामरगाव ( ता. नगर ) येथे आज बिबट्याने तब्बल सहा तास धूमाकूळ घालत महिलेसह दोघांवर हल्ला केला. दरम्यान गावातील एका बहादराने थेट बिबट्याला झडप घालत पकडण्याचे धाडस केले. यावेळी संतप्त गावक-यांनी केलेल्या झटापटीत बिबट्या ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.नगर तालुक्यातील कामरगाव येथे गुरुवार (दि.२०) दुपारी १ च्या दरम्यान गावातील महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ठोकळ वस्ती येथे घडली. या हल्ल्यात शालिनी सुरेश ठोकळ (वय-३२) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. ठोकळ वस्ती परिसरात शालिनी ठोकळ व रोहिणी संतोष कदम या दोन महिला शेतात चालल्या होत्या. यावेळी बिबट्याने शालिनी ठोकळ यांच्या अंगावर झेप घेतली. पाठिला व मानेला चावा घेतला. यावेळी रोहिणी कदम यांनी हातात दगडाने मारा केल्याने बिबट्याने धूम ठोकली व शेजारील असलेल्या ज्वारीच्या पिकात दडून बसला. या ठिकाणी बिबट्याचे दोन पिले ही आढळून आली आहेत. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचा-याने रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सीमा साठे यांचे पती गणेश साठे यांनी तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती सांगितली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला गणेश साठे यांच्यासह मच्छिंद्र जाधव, दादा ठोकळ, सुनील कातोरे, तुकाराम कातोरे, सुरेश ठोकळ यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गावात बिबटया आल्याची बातमी गावात पसरताच हजारोच्या संख्येने गावकरी गावात जमा झाले. यामुळे नगर - पुणे मार्ग ठप्प झाला. गावातील तान्हाजी माळी या गावक-याने बिबट्याचा शोध घेत त्यावर एकट्यानेच झडप घालण्याचे धाडस केले. त्यात माळी जखमी झाले. गावक-यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी बिबट्या व गावकरी यांच्यात झटापट होऊन बिबट्या मृत झाला. बिबट्या मृत झाल्याचे समजताच वनविभाग व पोलिस पथकाने गावात भेट दिली.
बिबट्या आराम करत असावा. त्याचवेळी तेथे मोठा जमाव आला. या बिबट्याच्या पोटाला मोठ्या जखमा आहेत. या जखमांमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. - भास्कर शिंदे, वनपरिक्षेत्रपाल , नगर तालुका वन विभाग,
पिंजरा न आल्याने गावकरी संतापलेघटनेची माहिती मिळताच विभागाचे पथक दाखल झाले. परंतु, वनविभागाकडे पिंजरा उपलब्ध नसल्याने त्यांनी अळकुटी (ता.पारनेर) येथून पिंजरा आणावा लागेल असे सांगितले असता सरपंच पती गणेश साठे यांनी गावातील वाहन पिंजरा आणण्यासाठी अळकुटीला पाठविले. परंतु गावात पिंजरा येण्यापूर्वीच बिबट्या ठार झाला.