अकोले : भाजप, किसान सभेच्या वतीने अकोलेतदूध दरवाढीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी अकोले पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.
दूध आंदोलन प्रश्नी शेतकरी नेते, किसन सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले, भाकपचे कारभारी उगले, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, भाजपचे अध्यक्ष सीताराम भांगरे, कम्युनिस्ट नेते शांताराम वाळुंज, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश नवले, सुरेश नवले यांच्यासह आदींसह विविध ५० कार्यकर्त्यांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
किसान सभेच्या वतीने शनिवारी अकोलेत चावडीवर गाय बांधून दगडाला दुग्धाभिषेक करुन आंदोलन केले होते. तर भाजपच्या वतीने माजी आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, मधुकर नवले यांनी महाएल्गार आंदोलन केले होते. जिल्हाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत.