नेवासा : नेवासा तालुका भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भाजपच्या ३० ते ३५ पदाधिकाºयांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पो.कॉ. प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरुन उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदारांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये दि.१ आॅगस्ट रोजीच्या रास्तारोकोला परवानगी नाकारली होती. रास्तारोको पुढे ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा, असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे नोटीस ही बजावली होती.
मात्र तरीही भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोंदकर, माजी आमदार मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, राजेश कडू, ज्ञानेश्वर टेकाळे, निरंजन डहाळे, रामचंद्र खंडाळे, विवेक ननवरे, संदीप आलवणे यांच्यासह तीस ते पस्तीस आंदोलकांनी नेवासा पंचायत समितीसमोर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. सोशल डिस्टन्सचेही उल्लंघन केले. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.