अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी जिल्ह्यात होत आहेत. अशाच दोन शिक्षकांवरही त्यांनी राजकीय पक्षाचा प्रचार केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. यात जिल्हा परिषदेने एकावर वेतनवाढ रोखण्याची, तर दुसऱ्याची विभागीय चौकशी करण्याची कारवाई केली आहे.
नगर तालुक्यातील इसळक येथील प्राथमिक शिक्षक धोंडिबा शेटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांचा फोटो असलेले स्टेट्स ठेवले अशी तक्रार मानव विकास परिषदेचे तुकाराम गेरंगे यांनी केली होती. ही तक्रार त्यांनी फोटोसह ४ एप्रिलला आचारसंहिता कक्षाकडे पाठवली होती. तसेच दुसरी तक्रार पाथर्डी तालुक्यातील भगवान फसले या शिक्षकाविरुद्ध झाली होती. त्यात शिक्षक फसले यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर मोदी सरकारचा प्रचार होईल, अशी पोस्ट टाकली होती. याबाबतही ४ एप्रिलला आचारसंहिता कक्षाकडे तक्रार झाली होती.
दरम्यान, आचारसंहिता कक्षाकडून जिल्हा परिषदेकडे या तक्रारी पाठवण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शिक्षकांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे मागवले. तसेच त्यांनी केलेल्या आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने तपासणी केली. यात पाथर्डीचे शिक्षक फसले यांच्यावर एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. तर शिक्षक शेटे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दाखल झालेल्या दोषारोपपत्रावर नाशिक विभागीय कार्यालयाकडून ही चौकशी केली जाणार आहे.
आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी कक्षाकडे दाखल होत आहेत. मात्र, त्यावर तातडीने कार्यवाही होत नसल्याच्याही तक्रारी होत आहेत. याच शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी गेला. एकीकडे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी १०० मिनिटांत निकाली काढण्याचा दावा जिल्हा प्रशासन करते, तर दुसरीकडे असे वीस-वीस दिवस जात असतील किंवा संबंधित विभाग कारवाईस चालढकल करीत असेल तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.